सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

दशहरा हाच धम्मचक्र प्रवर्तन दिन

दशहरा (दसरा) हाच धम्मचक्र प्रवर्तन दिन होय !....

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजया दशमी या मंगलदिनी 14 ऑक्टो 1956 साली आपल्या लाखो अनुयाया समवेत बौद्ध धम्माचि दीक्षा घेतली . अशा प्रकारे जगातील रक्तविरहित धम्मक्रांति घडवली. त्या नंतर अवघ्या 53 दिवसांमधे बोधिसत्व ड़ॉ बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले . त्यामुळे डॉ. बाबासाहेब अम्बेडकरांनी अशोक विजया दशमी हा दिवस महत्वाचा मानुन धम्मदीक्षा घेतली की, 14 ऑक्टो ही तारीख नज़रे समोर ठेवून धम्मदीक्षा घेतली?या प्रश्नाचे उत्तर शोधणे अतिशय महत्वपूर्ण वाटते !

इतिहास लेखनाला दोन गोष्टींचा आधार घेतला जातो . आपल्याला देखील वरील प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी  दोन पातळ्यांवर चिंतन करावे लागेल 1) तार्किक 2) तथ्य (facts)

प्रथमतः 1) तार्किक

14 ऑक्टो ही तारिखच का निवडली ?

या प्रश्नावर जर चिंतन केल्यास एक मूळ प्रश्न उभा ठाकतो तो म्हणजे ...
... या दिवसासंदर्भात असा काय इतिहास घडला आहे ?
उत्तर: काहीच नाही !

मित्रांनो !... या बाबत समाधानकारक उत्तर मिळत नाही !...

आता आपण अशोक विजया दशमी बाबत चिंतन करुया ...

अशोक विजया दशमी हा दिवासच का निवडला बाबासाहेबांनी ?...

आपण सर्वाना हे ज्ञात आहे की कलिंग देशावर सम्राट अशोकने स्वारी केलि . या युद्धात भयंकर नरसंहार झाला. हा नरसंहार पाहून सम्राट अशोक पश्चातापामुळे अगदी खचुन गेला , विजय मिळवून देखील सम्राट अशोकाला मनःशांती मिळत नव्हती . अशा परिस्तिथित निग्रोध नावाच्या भिक्खुनि केलेल्या उपदेशामुळे सम्राट अशोकाचे मनःपरिवर्तन झाले व त्याने बौद्ध धम्मचा स्वीकार केला . तो दिवस म्हणजे अशोकविजयादशमी म्हणून ओळखला जाऊ लागला. याच मंगलदिनी सम्राट अशोकने दहा धर्माज्ञा जाहिर केल्या. या दहा आज्ञा म्हणजे दशहरा सीमोल्लंघन होय ! पूर्वीच्या वैदिक धर्माची सिमा ओलांडून सम्राट अशोकने आपल्या प्रजाजना समवेत बौद्ध धम्मात प्रवेश केला ! हाच सण पुढे अशोक विजयादशमी दसहरा म्हणून साजरा करण्याची प्रथा पडली !
बौद्ध धम्माचा ऱ्हास होते वेळेस भारतीयान्ची अस्मिता बौद्ध धम्मपासून वेगळे करण्यासाठी वैदिक हिंदुनि ज्या प्रकारे महाभारत, रामायण लिहन्याचा खटाटोप केला , कपोलकल्पित वैदिक देवीदेवताचे अस्तित्व त्यांनी ग्रंथांद्वारे प्रमाणित केले , रामायण महाभारत अशी महाकाव्य प्रत्येक्षत इतिहास होती असे भसवण्यासाठी अस्तित्वात असलेल्या स्थळांचा सन्दर्भ जोडला( उदा. कुरुक्षेत्र,रामसेतु इ) त्या प्रमाणे अशोकविजया दशमी या सणाला देवी देवतांचा सन्दर्भ देवून त्याला धर्मशास्त्रांचा आधार देवून प्रमाणित करण्यात आले !...

बौद्ध धम्मतिल सर्वच सण हे चंद्राच्या कलेप्रमानेच !

काहि लोकांचा आक्षेप असतो की हिन्दू धर्माच्या तिथिप्रमाने असलेला सण का साजरा करायचा ?

बुद्धांच्या जीवनात ज्या महत्वपूर्ण घटना घडल्या त्या बऱ्याच घटना पौर्णिमा  किंवा अमवस्येच्या दिवशी घडल्या आहेत किंवा  धम्मदीक्षेच्या घटना मुद्दाम पौर्णिमेच्या दिवशी आयोजित करण्यात आल्या आहेत . त्याचप्रमाणे सम्राट अशोकने अश्विन शुद्ध दशमीला, भंते उपगुप्त यांच्या हस्ते बौद्ध धम्माचि दीक्षा घेतली (सदर दिवासचे महत्त्व बाबासाहेबांनी जानीले होते) ,याचाच अर्थ चंद्राच्या कलेला बौद्ध संस्कार म्हणून धम्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे ! बौद्ध धम्मात कालमापन पद्धति ही चंद्राच्या कलेवर आधारित असते ( हिंदूंच्या तिथिनुसार नव्हे!) . ख्रिस्ताचा जन्म बुद्धांच्या जन्माच्या 563 वर्षांनंतर झाला , ज्या दिवशी बुद्धांचा जन्म झाला त्या दिवसापासून बौद्ध दिनदर्शिकेची चंद्राच्या कलेनुसार सुरुवात मानली जाते !  भगवान बुद्धांचि जयंती ही ख्रिस्ती दिनदर्शिके नुसार साजरी केलि जात नाही ती वैशाख पौर्णिमेलाच साजरी केलि जाते , मग धम्मचक्रप्रवर्तनदिन हा ख्रिस्ती दिनदर्शिकेवर आधारित का साजरा करावा ?

तसेच ...

धम्मदीक्क्षेच्या वेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या त्यातील  सातवी प्रतिज्ञा
" मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत
असे कोणतेही आचरण करणार नाही." असे
असताना डॉ बाबासाहब आंबेडकर सारखे प्रकांड  पंडित व बौद्ध धम्माचे अभ्यासक आपल्या अनुयायाना  उद्धेषुन PTI(प्रेस ट्रस्ट ऑफ़ इंडिया) ला पत्र पाठवतात की "मी दासऱ्याच्या दिवशी धम्मदीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे ." याचे कारण तार्किक दृष्टया असे निघते की डॉ अम्बेडकरांना पूर्णपणे जाणीव होती की दशहरा (दसरा) हा बौद्धांसाठी अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे , या दिवशी सम्राट अशोकने धम्मदीक्षा स्वीकारली होती !...


...आता आपण तथ्याच्या आधारावर चिंतन करू ...

2)  तथ्य

"...कलिंगच्या युद्धात झालेल्या मानवी संहारामुळे दुक्खित होऊन तलवारीच्या सहाय्याने मानवांची हत्या करुण विजय मिळवण्यापेक्षा धम्माच्या सहाय्याने मने जिंकने श्रेयस्कर असा विचार करुण आपली तलवार सम्राट अशोकने ज्यादिवशि म्यान केलि तो दिवस म्हणजे अशोक विजयादशमीचा दिवस. तेंव्हापासून भारतात अशोक विजयादशमीच्या दिवशी उत्सव साजरा केला जातो. कारण त्या दिवशी मैत्री , करुणा, प्रज्ञेने क्रुरतेवर विजय मिळवला. म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीचा दिवस आपल्या धम्मदीक्षेसाठी निवडला ...."

---- सन्दर्भ: महाराष्ट्रातील बुद्ध धम्मचा इतिहास
        लेखक: इतिहासकार मा शं मोरे

भंते निग्रोध यांच्या उपदेशा नंतर अश्विन शुद्ध दशमि ला
भंते उपगुप्त यांच्या हस्ते सम्राट अशोकने बौद्ध  धम्माचि दीक्षा घेतली. धम्म दीक्षेच्या वेळी धम्मचक्र प्रवर्तनाय (अनुवर्तनाय नाही !) संकल्प उदघोषित करुन , बौद्ध धम्म अचारसंहितेवर आधारित दसहरा(दस + हरा  पालीे शब्द "हरा "म्हणजे "घेवून जाणारा ") वैदिक धर्मापासून दूर  बौद्ध धम्मकडे घेवून जाणारा  अधिकृत दसकलमि जाहिरनामा म्हणजे दसहरा प्रजेसाठी लोकनीति व धर्मनीति म्हणून प्रसारित केला . हाच प्रजाधर्म, नितिधर्म , राजधर्म समजून सर्वानी त्यांचा आदर करावा अशी राजाज्ञा जाहिर केलि . या राजाज्ञा जिथे जिथे तथागताच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना घडल्या त्या ठिकाणी स्तम्भ उभरूंण त्या स्तंभावर शिलालेख रूपात कोरण्यात आल्या. अशा प्रकारे इ स पूर्व 254 पासून अशोक विजया दशमिचा दसहरा म्हणजेच त्याचाच अपभ्रंश दसरा म्हणून सण साजरा केला जाऊ लागला .

सम्राट अशोकने प्रजेला उद्धेषुन जी राजाज्ञा रूपी नितितत्वे विविध अशोक स्तम्भावर कोरली ती तत्वे पुढील प्रमाणे...

1) धार्मिक स्थळी व कार्यक्रमात पशुहत्या किंवा पशुबळी न कारणे

2) चोरी , फसवणूक, लुबाडनुक इ न करणे

3) परस्त्रीगमन , व्यभिचार न करणे .

4) खोटे न बोलने , गैर व्यवहार न करने .

5) सार्वजनिक व पवित्र स्थळी मद्यपान न करने

6) नास्तिकपना , सत्कार्य व मनुसकिचा तीटकारा सोडून देणे

7) व्यक्ति गुणांने श्रेष्ट मनावा , त्याच्या जातीने नव्हे .

8) वैर सोडून दिल्यानेच वैर शांत होते हे विसरु नये.

9) धर्मगुरुनि सांगितलेले बहुजन हिताय बहुजन सुखाय व सदाचार हे आपले आचरण विसरु नये .

10) निति नियमांचे पालन करण्यास अमृताचा लाभ , नाहीतर मृत्युशी गाठ हे विसरु नये .

अशा प्रकारे सदर राजाज्ञा द्वारे सम्राट अशोकने बौद्ध धम्मास राजाश्रय देवून धम्माचे पालन करने हे आपल्या राज्यात बंधनकारक केले !

सदर राजाज्ञाचा United Nation's Declaration Of Human Rights   ने आपल्या Manifesto (जहिरनाम्यात) समावेश  केला आहे ही सर्व बौद्धांसाठी अभिमानास्पद बाबआहे  !

(सन्दर्भ: Story of India - documentary by Michel Palin, BBC)

आता आपण बाबासाहेबांनी अशोक विजयादशमी हा दिवसच का निवडला, याबाबत तथ्य आणि पुराव्यांचा विचार करू ...

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी  नागपुर हे स्थळ नागवंशी म्हणजेच बौद्ध राज्याची राजधानी म्हणून निवडले , तसे  स्पष्टीकरण त्यांनी 5 ऑगस्ट 1956 ला सोहनलाल शास्त्री यांच्या सोबत झालेल्या बैठकीत त्यांना विचारलेल्या प्रश्ना प्रसंगी दिले होते. ( सन्दर्भ : चांगदेव खैरमोडे लिखित डॉ आंबेडकर चरित्र खंड 12) त्या प्रमाणेच अशोक विजया दशमी दासऱ्याच्या दिवसचे महत्त्व जाणूनच बाबासाहेबांनी हा दिवस धर्मान्तरास निश्चित केला ...

त्या संदर्भात प्रमाणित (Authenticated) पुरावे पुढील प्रमाणे ...

पुरावा क्र. 1

डॉ . आंबेडकरांनी PTI(Press Trust of India) ला उद्धेषुन 23 सप्टेम्बर 1956 रोजी एक पत्र लिहले त्या पत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट शब्दात सांगतात की... धम्मदीक्षा हा सोहळा दासऱ्याच्या दिवशी पार पडेल ! त्याचा सन्दर्भ पुढील प्रमाणे !...

प्रा. चांगदेव खैरमोडे लिखित महाराष्ट्र शासन प्रकाशित डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रन्थ खंड 12 पृ 27 ,28 मधील सन्दर्भ अतिशय महत्वाचा आहे तो पुढील प्रमाणे....

....श्री गोडबोले सात आठ माणसे घेवून दिल्लीला आले . बाबासाहेबांनी सर्वंशि विचारविनिमय करुण  सर्व कार्यक्रम निश्चित केला. आणि दीक्षेची तारीख  14 ऑक्टो 1956 विजयादशमी ही निश्चित केलि. 23 सप्टेम्बरला बाबासाहेबांनी वृत्तसंस्थाना निवेदन पाठवले की हा समारम्भ 9 ते 11 च्या दरम्यान होईल. हे निवेदन प्रेस ट्रस्ट ऑफ़ इंडिया( PTI ) यावृतसंस्थेने प्रसारित केले....

बाबासाहेबांनी प्रेस ट्रस्ट ऑफ़ इण्डियाला निवेदनपर पत्र पाठवले ते पुढीलप्रमाणे...

                   26, अलीपुर रोड
                   दिल्ली,23 सप्टे 1956

" बौद्ध धम्म स्वीकारण्याचा दिवस व ठिकाण मी आता निश्चित केले आहे, "दसऱ्याच्या" दिवशी तारीख 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुर येथे मी बौद्ध धम्म दीक्षा घेणार आहे.

या दिवशी सकाळी 9 ते 11 माझा धम्मदीक्षा समारम्भ होईल व संध्याकाळी माझे सर्व लोकांसाठी जाहिर व्याख्यान होईल."

                  बी. आर आंबेडकर
                   23-09-1956

(प्रबुद्ध भारत : आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक दिनांक 27-01-1956, पा.29)

PTI ला दिलेल्या वरील पत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवर्जून दासऱ्याच्या उल्लेख करतात ..

पुरावा क्र.2

14 ऑक्टो 1956 साली बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत धम्मदीक्षा घेवून धम्मचक्र प्रवर्तन केले त्या वेळेस जी निमंत्रण पत्रिका प्रकाशित करण्यात आली त्यातील मजकूर पुढीलप्रमाणे ...

             ||  समुदाइक धर्मान्तर ||

भारतीय बौद्धजन समितिचे संस्थापक व अध्यक्ष परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्धधर्म ग्रहण विधि पूज्यभिक्खु चंद्रमणि महास्थविर यांच्या हस्ते नागपुर येथे रविवार ,तारीख 14 ऑक्टो 1956 "विजयादशमी दिवशी " सकाळी 8 वाजता साजरा होईल .

सदर निमंत्रण पत्रिकेत स्पष्ट शब्दत 'विजयादशमी " या दिवासाचा उल्लेख आढळतो !

पुरावा क्र. 3

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण नंतर एक वर्षाने  3 ऑक्टो 1957 (14 ऑक्टो नव्हे !) रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमा दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाला पूज्य भंदन्त आनंद कौसल्यायन , यशवंतराव आंबेडकर , एन शिवराज, दादासाहेब गायकवाड़, दादासाहेब रूपवते, बॅ.राजाभाऊ खोब्रागड़े इ. बाबासाहेबांच्या सोबत खांद्याला ख़ान्दा लावून चळवळ चलावणारे महानुभाव उपस्थित होते . दादासाहेब गायकवाड़ तर बाबासाहेबांच्या सावलिसारखे सोबत होते , बाबासाहेब दादासाहेब गायकवाडांपाशी तर आपल्या  वैयक्तिक कौटुम्बिकबाबी बाबत देखिल सल्लामसलत घेत असत ते दादासाहेब सदर कार्यक्रमस हजर होतेे ,त्यांनी देखील सदर प्रसंगी आक्षेप घेतले नाही .  डॉ. अम्बेडकरांनंतर जर कोणी बौद्ध धम्माचे गाढ़े अभ्यासक असतील तर ते भदंत आनंद  कौसल्यायन होत . ते देखील सदर कार्यक्रमस हजर होते , त्यांना बौद्ध धम्माच्या विसंगत कृत्य वाटले असते तर त्यांनी आक्षेप घेतला नसता का ? . हे सर्व विचरवंत मंडळी उपस्थित असताना, एकाही महानुभवांनि या अशोक विजया दशमी दिवशी आयोजित कार्यक्रमास आक्षेप घेतला नाही ,कारण या सर्वाना त्या दिवसाचे महत्त्व ज्ञात होते.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाबाबत संभ्रम निर्माण करणारी ही बाब अतिशय गांभीर्याने घेण्यासारखी आहे .. कारण ज्या प्रमाणे शिवजयंतीच्या तारखेवरुन गोंधळ निर्माण करुण शिवजयंतीचे महत्त्व कमी करण्यात आले त्या प्रमाणे काहि मनुवादी वृत्तिचे लोक , 14 ऑक्टो . हाच धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, अशोकविजया दशमी दसहरा नव्हे ! असे बिम्बवुन त्या दिवासचे महत्त्व कमी करण्याचे षड्यंत्र करू पाहत आहेत ! असे लोक डॉ बाबासाहेबांनी धम्मचक्र जे प्रवर्तित(वैचारिक गति प्रदान करने) केले त्या धम्म चक्राच्या गतिला खीळ घळण्यास प्रयत्नरत आहेत !




14 ऑक्टो . हा धम्मचक्र प्रवर्तन दीन मुळीच नाही म्हणून तो साजरा करू नये !

दशहरा (दसरा) अशोक विजया दशमी हाच आपला धम्मचक्र प्रवर्तन दिन होय !

अशोक विजयादशमी दसहरा (दसरा) मोठ्या हर्षोल्हासात साजरा करा !

जागृतिचा विस्तव तेवत ठेवा !  प्रबुद्ध व्हा  !!
जय भीम !

नवरात्री कशाला

आला आला नवरात्री चा सण आला, "जयभिमवाला" पुन्हा घट बसवाया सज्ज झाला..#
नऊ दिवस आता त्या देवीला घरी आणणार. हजारोंनी पैैसा खर्च करून तिची उपासना करणार, प्रत्येक जण आता गहाण ठेऊन मस्तक होतील तिच्यापुढे नतमस्तक..#
मुलगा अडमिशन मिळावे म्हणून तिच्यासमोर टेकवील माथा आणि काॅलेजात जाऊन बोलेल कास्ट सर्टिफिकेट आहे माझ्याकडे अडमिशन द्या मला आताच्या आता..#
मुलगी म्हणेल हे देवी मी चांगल्या मार्काने पास होउ दे, अगं तुला शिक्षणाचा अधिकार मिळाला कुठून हे तरी आधी तुला कळू दे..#
वडील म्हणतील मी बाहेर गेलो तर घर माझे सुरक्षित ठेव, अरे संकटकाळी बाप लढला होता तेव्हा कुठे गेला होता रे तुझा देव..#
आई म्हणेल देवी तुझ्यामुळे माझ्या घराला सुखशांती मिळाली, अगं विचार कर जरा, जर बाबाच नसते आपल्या पाठीशी तर ख-या सुखाची व्याख्याच नसती कळाली..#
तेव्हा आता दगडधोंड्यांवर खर्च करुन पैसा आपण का रिकामा करतोय आपलाच खिसा. अरे आपल्या पदरात आहे कितीतरी महापुरुषांचा वारसा, त्यांचे तत्वज्ञान म्हणजेच आहे आपल्या प्रागतीक जीवनाचा आरसा, तेव्हा आता त्यांच्या विचारांचा घेउन वसा, हे मुर्खपणाचे वागणे सोडून जरा आता शहाण्यांच्या रांगेत बसा..#
अरे तु आज जे काही आहेस ते माझ्या भिमाच्या पुण्याईने, तुला सगळ देण दिलय माझ्या बापाने. आणि तु बापालाच गद्दारी करतोयस. बाहेर निघ या देव-देवतांच्या गौंधळामधुन, देवी-देवतांच्या नादी लागशील तर भिक मागत फिरशील. अरे बापाने दिलेल्या 22प्रतिज्ञा वाच. बौध्दांनो आता तरी जागे व्हा..#
#...जय भिम...नमो बुध्दाय...#

बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५

अफगाणिस्थानात बुध्द मुर्ती


अफगाणिस्तानातील मेस आयनाक या ठिकाणी शंभर एकर
परिसरात पाचशेहून अधिक बुद्ध मूर्ती आणि त्याही खाली
जमिनीत ताम्रयुगातील आदिम अवशेष सापडले आहेत.
मात्र त्यापूर्वीच अफगाण सरकारने तीन अब्ज अमेरिकन
डॉलर्सला हा परिसर खणकामासाठी चिनी कंपनीच्या
ताब्यात दिला आहे. आता जगासमोरचा प्रश्न आहे,
मानवाच्या आदिम पाऊलखुणांचे काय होणार? मेस आयनाक
या अफगाण भाषेतील शब्दाचा अर्थ तांबे सापडणारा
लहानसा स्रोत असा होतो. काबूलपासून सुमारे ४०
किलोमीटर अंतरावर लोगार या रेताड वाळवंटसदृश भागात हे
ठिकाण वसलेले आहे. मेस आयनाक जगभरात चर्चेत
येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दहशतवादाच्या छायेतून
पुन्हा स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या
अफगाण सरकारने येथील तांब्याच्या या खनिज संपत्तीचा
वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जागतिक
निविदाही काढल्या. चीनच्या चायना मेटलर्जिकल कंपनीला
त्याचे कंत्राट मिळाले. त्यांनी खणकामास सुरुवातही केली
आणि प्रत्येक ठिकाणी थोडे खणल्यानंतर बुद्धमूर्ती हाती
लागण्यास सुरुवात झाली. एक भाग या मूर्तीनी व्यापलेला
असेल असे वाटले म्हणून काही दूर अंतरावर खणकामास
सुरुवात केली तर तिथेही बुद्धमूर्ती. असे करत संपूर्ण १००
एकरांच्या परिसरात सुमारे ५००च्या आसपास बुद्धमूर्ती
आजवर सापडल्या आहेत. दरम्यान, पुरातत्त्वतज्ज्ञांना
असे लक्षात आले की, मेस आयनाक हे एके काळी पूर्णपणे
बौद्ध शहर होते. आता हे पुरातन शहर कायम राखण्यासाठी
आणि इथे खणकामास परवानगी देऊ नये यासाठीच्या एका
मोठय़ा जागतिक मोहिमेला सुरुवात झाली आहे. या
प्रकरणात आता अफगाणिस्तान सरकार आणि चीन या
दोघांचीही मोठी पंचाईत झाली आहे आणि हे खणकाम सध्या
थांबलेल्या अवस्थेत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत
इथे खणकाम होणारच असा निर्णय चिनी कंपनीने घेतला
असून त्याबद्दल जगभरातील पुरातत्त्वतज्ज्ञांमध्ये
चिंता व्यक्त होत आहे. कारण केवळ बुद्धमूर्तीपुरताच हा
विषय मर्यादित नाही. इथे खूप मोठय़ा अशा बौद्ध वस्तीचे,
मठाचे, तत्कालीन शहराचे अवशेष सापडलेले असले तरी
त्याहीखाली करण्यात आलेल्या उत्खननामध्ये
ताम्रयुगातील अवशेषही सापडले आहेत. त्यात तांबे
वितळवून त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करणारी त्या वेळची
भट्टीही सापडली आहे. साहजिकच त्यामुळेच मेस
आयनाकचे अस्तित्व हे ताम्रयुगापर्यंत मागे जात
असल्याचे संशोधकांना लक्षात आले आहे. अशा प्रकारे
प्रचंड विस्तार असलेले जगातील हे दुसरे मोठय़ा
आकारमानाचे ठिकाण ठरले आहे. त्यामुळे आता संपूर्ण
जगाचे लक्ष याकडे वेधले गेले आहे. हे लक्ष वेधले
जाण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे
अफगाणिस्तानला असलेला दहशतवादी कारवायांचा धोका
अद्याप कायम आहे. अफगाणींचे जीवन आजही
दहशतवादाच्या छायेखालीच सुरू आहे. या पूर्वीच २००१
साली अफगाणिस्तानातील बामियान येथील जगातील
सर्वात उंच बुद्ध शिल्पकृती इस्लामी दहशतवाद्यांनी
तोफगोळ्यांनी उद्ध्वस्त केली होती. संपूर्ण जगभरात
त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली पण त्याने
दहशतवाद्यांना फारसा फरक पडला नाही. अफगाणिस्तान
हा एकेकाळी बौद्ध प्रदेश होता, याचे दाखले तर इतिहासात
ठायी ठायी पाहायला मिळतात. मग ते ह्य़ुआन श्वांग या
चिनी बौद्ध भिक्खूचे प्रवासवर्णन असो किंवा मग
सापडणारे पुरातत्त्वीय पुरावे असोत. अफगाणिस्तानात
आपल्या वर्चस्वाखाली असलेल्या सर्व प्रांतांमध्ये
दहशतवाद्यांनी इस्लामी नसलेल्या सर्व गोष्टी नेस्तनाबूत
करण्याची मोहीमच चालवली. त्याचा सर्वाधिक फटका
बौद्ध संस्कृतीला बसला आहे. अफगाणिस्तानामध्ये
सर्वाधिक बौद्ध शिल्पकृती दहशतवाद्यांनी हातोडय़ाने
किंवा हाती येईल त्या अवजाराने फोडून टाकल्या. असाच
धोका या मेस आयनाक प्रांतालाही आहे आणि गेल्या सुमारे
दोन वर्षांत जगभरातील इस्लामी दहशतवाद्यांनी पुन्हा
आक्रमक रूप धारण केल्याने हा धोका आता अधिकच
वाढला आहे. त्यामुळेच इथे सापडलेल्या महत्त्वाच्या
असलेल्या या बौद्ध अवशेषांनाही धोका निर्माण झाला
आहे. अफगाण सरकारने इथे सुरक्षा रक्षक ठेवलेले आहेत,
पण ते पुरेसे नाहीत, असे इथे काम करणाऱ्या
पुरातत्त्वतज्ज्ञांना वाटते. पाकिस्तानातून पुढे
जाण्यासाठी दहशतवादी ज्या मार्गाचा वापर करतात,
त्याच मार्गावर मेस आयनाक येत असल्याने
पुरातत्त्वतज्ज्ञ दररोज श्वास रोखून येथे काम
करतात.येथील जनता मात्र ही बौद्ध परंपरा ही याच
प्रांताची महत्त्वाची संस्कृती असल्याचे मानते. त्याचा
त्यांना रास्त अभिमानही आहे. मात्र या जनतेच्या
डोक्यावरही इस्लामी दहशतवाद्यांची टांगती तलवार कायम
आहे. इथे काम करणारे काही अफगाणी पुरातत्त्वतज्ज्ञ
आणि स्थानिक नागरिक जिवाची बाजी लावून ही संस्कृती
वाचविण्यासाठी जिवाचा आटापिटा करत आहेत. फारसे पैसे
हाती नसतानाही पुरातत्त्वतज्ज्ञ बिनपगारी काम करत
आहेत, स्थानिक नागरिकही इथे येऊन प्रचंड विषम अशा
वातावरणात म्हणजेच कडाक्याची थंडी, बर्फ, तर कधी
पराकोटीची उष्णता या वातावरणात जिवावर उदार होऊन
काम करत आहेत. बामियानमध्ये घडले त्या इतिहासाची
पुनरावृत्ती इथे होऊ नये म्हणून सर्व जण एकत्र आले
आहेत. मात्र अफगाण सरकार चिनी कंपनीकडून लिलावाचे
पैसे घेऊन बसले आहे. ही रक्कम थोडी- थोडकी नव्हे तर
तब्बल तीन अब्ज डॉलर्स एवढी मोठी आहे. त्यामुळे पैसे
वसूल करण्यासाठी इथे तांब्याची खाण करणारच, असा विडा
चिनी कंपनीने उचलला असून त्यांच्या कामाला आता
कोणत्याही क्षणी सुरुवात होणार आहे. मेस आयनाकचे
महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाची पाने
उलटावी लागतील. इसवीसन पूर्व काळापासून जगाचा
व्यापार सुरू होता तो प्राचीन अशा रेशीम मार्गाने. हा मार्ग
चीनपासून सुरू होत थेट युरोपापर्यंत पोहोचला होता.
त्यावेळचाच नव्हे तर अगदी १९व्या शतकाच्या
सुरुवातीपर्यंत हाच जगातील प्रमुख व्यापारी मार्ग होता.
रेशीम मार्ग जसा रस्त्यावरून जायचा तसाच नंतरच्या
कालखंडात जलरेशीम मार्ग तयार झाला. रेशीम मार्गावरील
एका राजाने हा संपूर्ण मार्गच रोखून धरल्यानंतर त्यावर
उतारा म्हणून तत्कालीन भारतीय व्यापाऱ्यांनी जलरेशीम
मार्ग शोधला होता. मात्र नंतर रोखून धरलेला हा मार्ग
मोकळा करण्यात आला. हा रेशीम मार्ग चीनपासून ते
पश्चिम आशियापर्यंतच्या अनेक देशांना जोडत पुढे जातो.
ज्या इसवी सन पूर्व कालखंडाबद्दल आपण बोलत आहोत,
त्या कालखंडात विद्यमान अफगाणिस्तान हा भारताचाच
एक भाग होता. इसवी सनपूर्व सहाव्या शतकात उदयाला
आलेल्या बौद्ध धर्माचा प्रसारही याच व्यापारी मार्गाने
जगभरात झाल्याचे दाखले इतिहासात सापडतात तर आजवर
अनेक उत्खननांमध्ये त्याचे पुरावेही सापडले असून त्यावर
शिक्कामोर्तबच झाले आहे. एक काळ असा होता की, बौद्ध
हा जगभरातील एक प्रमुख धर्म होता. ज्या मंगोलवंशीय
राजांनी अध्र्या जगावर राज्य केले त्यांच्यापैकी गोदान
खान (चेंगिझ खानचा नातू) व त्याच्यानंतर राजसत्ता
ग्रहण करणारा सेच्येन खुब्लाई खान यांनी बौद्ध धर्माचा
स्वीकार करून त्यांच्या साम्राज्याचा तो राजधर्म
असल्याचे जाहीर केले होते. हा प्राचीन मार्ग तक्षशिलेहून
बॅक्ट्रियामार्गे पुढे युरोपच्या दिशेने जातो. याच मार्गावर
काबूलपासून काही अंतरावर हे मोठे बौद्ध शहर वसलेले
आहे. या शहरातील रस्ते, बाजारपेठ, बौद्ध मठ, भिक्खूंचे
विहार, सामान्य उपासकांची घरे आदी सारे या
उत्खननामध्ये पुरातत्त्वतज्ज्ञांना सापडले आहे.
तज्ज्ञांनी ज्या मातीच्या थरावर हे शहर सापडले, त्याही
खाली जाऊन अधिक शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तर
मानवाच्या आदिम पाऊलखुणाच त्यांच्या हाती लागल्या.
ताम्रयुगातील मानवाच्या पाऊलखुणा, त्याने वापरलेल्या
वस्तू, तांबे वितळवण्याची व शुद्ध करण्याची भट्टी या
सर्व गोष्टी सापडल्या असून त्यात तत्कालीन मातीच्या
भांडय़ांचे अवशेषही समाविष्ट आहेत. इथे सापडलेल्या या
सर्व पुरातत्त्वीय वस्तूंवर पर्शिया, चीन व भारतीय कला-
संस्कृती पगडा संशोधकांना आढळला आहे. मेस
आयनाकमध्ये सापडलेल्या एका स्तूपाच्या शेजारी
सापडलेल्या मानवी सांगाडय़ाच्या कवटीवर तर जमिनीखाली
मुबलक प्रमाणात असलेल्या तांब्याचे पुरावेच सापडले
आहेत. तांबे खुल्या वातावरणात येते तेव्हा येथील
ऑक्सिजनशी झालेल्या संयोगानंतर त्याचा रंग काहीसा
हिरवट होतो. ती हिरवट झाक येथे सापडलेल्या मानवी
सांगाडय़ाच्या कवटीवर आणि इतर अवशेषांवरही पाहायला
मिळते. बौद्ध परंपरेमध्ये थेरवादी (हीनयान) आणि महायान
असे दोन महत्त्वाचे भेद पाहायला मिळतात. पहिल्या
परंपरेमध्ये मूर्तिपूजा नसल्याने स्तूप किंवा बुद्धाची
पावले, बोधिवृक्ष यांची पूजा प्रतीकात्मक रूपात केली जात
होती. तर नंतर महायान परंपरेमध्ये मूर्तिपूजा पाहायला
मिळते. मेस आयनाक येथे सापडलेल्या पुरावशेषांमध्ये
नानाविध प्रकारचे नक्षीकाम केलेले, वेगवेगळी
आकाररचना असलेले स्तूप पाहायला मिळतात. असे
आकारांचे व नक्षीकामाचे वैविध्य तर भारतातील
स्तूपांमध्येही संशोधकांना फारसे पाहायला मिळालेले नाही.
म्हणूनच हे स्तूप जपले जाणे खूप महत्त्वाचे आहे.
इथल्या शिल्पकृतींवर गांधार शैलीचा पूर्ण प्रभाव पाहायला
मिळतो. किंबहुना गांधार शैलीच या परिसरात उगम पावली,
असे इतिहास सांगतो. याही दृष्टीने इथल्या शिल्पकृतींची
जपणूक होणे महत्त्वाचे आहे.महाराष्ट्रातील अजिंठा
लेणींमध्ये सहाव्या शतकात खोदण्यात आलेल्या लेणींत
आपल्याला चित्रे पाहायला मिळतात. या चित्रांना आणि
पर्यायाने अजिंठा लेणींना त्यांच्या त्या अप्रतिम
सौंदर्यामुळेच जागतिक वारशाचा दर्जा मिळाला आहे. मेस
आयनाकमध्ये सापडलेली बुद्ध चित्रे हीदेखील त्याच
कालखंडातील किंवा त्याही आधीची असावीत, असा
संशोधकांचा अंदाज आहे. काही शिल्पकृती रंगविलेल्या
अवस्थेतील आहेत. यातील काहींचे आयुर्मान हजार वर्षांचे
असावे, असाही संशोधकांचा अंदाज आहे. म्हणूनच मानवी
इतिहासातील सुमारे पाच हजार वर्षांचा इतिहास आजवर
व्यवस्थित राखून ठेवलेला हा परिसर जागतिक वारसा
यादीत नोंदवावा आणि येथील खणकाम पूर्णपणे थांबवावे,
असे वाटणाऱ्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी एकत्र येऊन
मेस आयनाक वाचवा ( # २ं५ीेी२ं८ल्लं ‘), अशी हाक दिली आहे.
१९७३-७४ च्या सुमारास रशिया आणि अफगाणिस्तानच्या
काही पुरातत्त्वतज्ज्ञांनी या परिसरातील खनिज
संपत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या
उत्खननामध्ये सर्वप्रथम याचे पुरातत्त्वीय महत्त्व
लक्षात आले होते. त्यानंतर इतिहासतज्ज्ञ आणि
पुरातत्त्वतज्ज्ञांचे या परिसराकडे लक्ष गेले. आजवर
झालेल्या अभ्यासानंतर पाचवे ते सातवे शतक हा दोन
शतकांचा कालखंड मेस आयनाकमधील सुवर्ण कालखंडच
असावा, या निष्कर्षांप्रत संशोधक पोहोचले आहेत.
आठव्या शतकामध्ये येथील बौद्ध धर्म आणि संबंधित
संस्कृतीच्या ऱ्हासाला सुरुवात झाली आणि १० व्या
शतकाच्या अखेरीस हे ठिकाण सोडून माणसाने इतरत्र
वस्ती केली. २००७ साली नोव्हेंबर महिन्यात हा परिसर
भाडेतत्त्वावर खाणीसाठी देण्याचा निर्णय झाला. ३०
वर्षांच्या भाडेपट्टय़ाने त्याचा व्यवहारही झाला आहे. ३
अब्ज डॉलर्स ही चीनने त्याद्वारे केलेली गुंतवणूक ही
आजवरची अफगाणिस्तानातील सर्वात मोठी विदेशी
गुंतवणूक आहे. त्यामुळेच अफगाण सरकारवर यासाठी
चीनचा दबावही आहे. आजवरच्या अभ्यासानुसार या बौद्ध
शहराच्या खाली जमिनीमध्ये ५.५२ दशलक्ष मेट्रिक टन
एवढे तांबे दडलेले आहे. तर त्याची किंमत १० अब्ज
डॉलर्सहून अधिक आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये
मोठय़ा प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची शक्यताही
आहे. गेली काही वर्षे येथील खणकाम थांबलेले होते. मात्र
आता फार काळ वाट पाहता येणार नाही, असा इशाराच
चीनने दिला आहे. त्यांनी पुरातत्त्वतज्ज्ञांना दिलेली
मुदतही संपत आली आहे. त्यामुळे आता मानवाच्या या
आदिम पाऊलखुणांचे काय होणार, हा यक्षप्रश्नच आहे.
त्यासाठी पुरातत्त्वतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील
मंडळींनी एकत्र येऊन सेव्ह मेस आयनाक ही चळवळ सुरू
केली आहे. याच्या प्रसारासाठी त्यांनी ट्विटर, फेसबुक
आदी सोशल नेटवर्किंगचाही आधार घेतला आहे. ‘सेव्हिंग
मेस आयनाक’ हा माहितीपट तयार करण्यात आला असून
जगभरात तो दाखविला जात आहे. या चळवळीच्या
माध्यमातूनच या कामासाठी आर्थिक मदतही गोळा केली
जात आहे. काही देशांमधील नागरिकांनीही यात पुढाकार
घेतला आहे. मात्र पुढाकार घेतलेल्यांमध्ये बुद्धाची भूमी
असलेल्या भारताचा किंवा भारतीयांचा समावेश फारसा दिसत
नाही!